देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव (कोंडकदम) ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्तच रहावा, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसीबाबत असलेले गैरसमज दूर करून घेत ग्रामस्थांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. एकाच दिवशी १४० जणांचे लसीकरण करून घेतले आहे.
गावच्या सरपंच माधवी प्रमोद अधटराव अणि उपसरपंच रूपेश माने यांच्या नेतृत्वाखाली तुळसणी उपकेंद्रात ४५ वर्षांवरील तब्बल १४० ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले. असा उपक्रम करणारी आंबव ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
विशेष म्हणजे यासाठी आंबव ते तुळसणी ये-जा करण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहने उपलब्ध करून दिली. वयोवृद्ध ग्रामस्थांची चहा-नाश्त्याची सोयही करण्यात आली होती. शारीरिक अंतर राखून व कोविडचे सर्व नियम पाळून हा उपक्रम करण्यात आला. यासाठी तुळसणी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनीही सहकार्य केले.