अडरे : चिपळूण शहरातून परदेशात नोकरी व शिक्षणानिमित्ताने जाणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांसाठी येथील नगर परिषद आरोग्य विभागातर्फे विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या लसीकरण मोहिमेत सुमारे दोनशेजणांनी कोविशिल्डची लस घेतली.
चिपळूण शहरात परदेशातून सुट्टीवर अनेकजण आले असून, त्यांची सुट्टी संपली आहे. तसेच अनेक तरुण-तरुणींना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी परदेशात जायचे आहे. त्यांना कोविशिल्ड घेतल्याशिवाय परदेशात जाता येणार नव्हते. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, नगर परिषदेचे आरोग्य सभापती शशिकांत मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा, खालिद दाभोलकर, नगरसेवक आशिष खातू, नाझीम अफवारे यांनी परदेशात जाणाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगर परिषद आरोग्य विभागाने शहरातील एल टाईप शाॅपिंग सेंटर व पोलीस वसाहतीत लसीकरण मोहीम राबवली.