खेड : खेड एस. टी. आगारातील ४३४ पैकी ३५३ अधिकारी, कर्मचारी व चालक-वाहकांना लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या संकटात आतापर्यंत २० जणांना कोरोनाची लागण झाली, तर एका चालक कम वाहकाला प्राण गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात बसस्थानकात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकूण २० जण कोरोनाबाधित आढळले. मात्र, चालक तथा वाहक म्हणून कार्यरत असलेले राधाकिसन ईश्वर ससाणे (४०, मूळचे रा. देवराई-बीड, सध्या रा. खेड) यांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. येथील एस. टी. आगार व बसस्थानक असे दोन विभाग आहेत. महाड नाका येथे असलेल्या एस़ टी़ आगारात तांत्रिक विभागाचे ४८ व अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील ३८ असे ८६ जण कार्यरत आहेत. यातील ८३ जणांचे लसीकरण झाले असून, एक महिला कर्मचारी गर्भवती असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकात वाहक, चालक व इतर असे एकूण ३४८ कर्मचारी आहेत. यातील २७० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.