सद्यस्थितीत कोरोना रुग्णांसाठी १,८८१ बेड्स असून, १,६२८ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता, बेड्सची संख्या आणखी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड सेंटर करण्यात आले आहे. गुहागर, दापोलीमध्येही अन्य केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी कोरोना सेंटर उभारणीचे नियोजन सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील १,८८१पैकी ४४१ बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे. आरोग्य विभागाकडून ऑक्सिजन बेड कमी पडणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येत असून, तोही लवकरच सुरू होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १५००० पर्यंत पोहोचली आहे. शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये दिवसाला आता ५०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. त्यातच लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा रुग्णांना कोरोना केअर सेंटर्स तसेच गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने खाटांची क्षमता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे आता ज्यांना लक्षणे नाहीत, अशांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यावर भर दिला जात आहे.
येत्या दोन दिवसांत युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविणे तसेच कोविड सेंटर उभारणे, याकडे जिल्हा प्रशासनाने अधिक भर दिला आहे; मात्र या वाढत्या रुग्णांवर तेवढ्याच जलदगतीने उपचार करण्यासाठी सर्व मशिनरी, औषधे यांची उपलब्धता असली तरीही त्याकरिता महत्त्वाचे असलेले मनुष्यबळ अपुरे आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया तातडीने केली जात आहे; मात्र डाॅक्टर्स पदासाठी अजूनही प्रतिसाद फार कमी आहे. त्यामुळे कोविड आणि नाॅन कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार करताना आहे त्याच मनुष्यबळाचा वापर करताना यंत्रणेची ओढाताण होत आहे.
चाैकट
सध्या जिल्ह्यात खासगी व सरकारी मिळून १९ कोरोना रुग्णालये असून, १६ कोरोना केअर सेंटर्स आहेत. जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालये मिळून एकूण १,८८१ बेड्स आहेत. त्यापैकी ४४१ ऑक्सिजन बेड्स, १,३२३ साधे बेड्स, ११५ आयसीयू बेड्स आहेत. अजून तरी जिल्ह्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवलेला नाही; मात्र रोज नव्याने आढळणारे रुग्ण लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तरी ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
चाैकट
हेल्पिंग हॅण्डस धावले मदतीला
गेल्या वर्षाप्रमाणेच यावेळी कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढताच आरोग्य यंत्रणेची लसीकरण आणि कोरोना रुग्णांवर उपचार ही दुहेरी कसरत सुरू झाली आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर ही यंत्रणा गेले वर्षभर राबते आहे; मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाचा हाहाकार उडताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. यात रत्नागिरीतील सुमारे २८ संस्थांच्या फोरम असलेल्या ‘हेल्पिंग हॅण्डस’ च्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कोरोना आपत्ती काळात मदतीसाठी उडी घेतली आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरात बसलेल्या लोकांना घरपोच सेवा देण्याबरोबरच लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांना मदत करणे, कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना मदत करणे आदी सर्व प्रकारची मदत हे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.