चिपळूण : शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहिमेत पुरता गोंधळ उडाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लस घेण्यासाठी नागरिकांना पहाटेपासून त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लसीकरण केंद्रे मर्यादित असल्याने तेथे गर्दीचे प्रमाण वाढत आहे.
परिसरातील नागरिकांचा विरोध
लांजा : मृत कोरोनाबाधित व्यक्तींवर आपल्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, अशी मागणी कुक्कुटपालन, डाफळेवाडी, कुंभारवाडी, मासूमनगर येथील नागरिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
हळद लागवडीद्वारे रोजगारनिर्मिती
साखरपा : संगमेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात हळद लागवडीद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार, स्वयंरोजगाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावर अनेकांनी भर दिला आहे. कोकण कृषी विद्यापीठाने हळकुंडापासून तयार केलेली नवीन रोपे बहुतांशी ग्रामस्थांनी लागवडीसाठी वापरली आहेत.
चौकशी करण्याची मागणी
चिपळूूण : पाग प्रभाग क्रमांक १३ येथील रस्ता गटारे यांची कामे मार्च २०१८ मध्ये सुरू झाली. यातील काही गटारे सुस्थितीत असताना ब्रेकरच्या साहाय्याने फोडून तेथे नवीन गटारे करण्यात आली. रस्ता करण्यापूर्वी गटारे होणे आवश्यक होते, परंतु तसे झालेले नाही.
प्रथमच टँकरद्वारे पाणीपुरवठा
गणपतीपुळे : गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सर्व वाड्यांमध्ये बुधवारपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या खोदाईचे काम करणाऱ्या जेसीबीने नळपाणी योजनेची पाइपलाइन तोडल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
देव्हारेत बाजारात गर्दी
मंडणगड : देव्हारे पंचक्रोशीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मे महिन्यात मोठी वाढ झाली. कोरोनामुळे माणसे मरत असताना देव्हारे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडविल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
शासकीय कार्यालयाचे निर्जंतुकीकरण
गुहागर : भाजपतर्फे गुहागर शहरातील तहसीलदार कार्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोविड युद्धातील नियोजनामध्ये व्यस्त असणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयांबरोबरच पोलीस वसाहतीचेही निर्जंतुकीकरण भाजप कार्यकर्त्यांनी केले. त्यासाठी संतोष जैतापकर यांनी पुढाकार घेतला.
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी ग्रामपंचायत क्षेत्रात माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ग्रामस्थांनी कोरोनामुक्तीवर भर द्यावा, असे आवाहन उपसरपंच मिथुन लिंगायत यांनी केले आहे.
हातखंब्यात हापूसची विक्री ठप्प
हातखंबा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा तिठ्यावर भरणाऱ्या मिनी हापूस बाजाराला सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन, संचारबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. सुमारे १०० ग्रामस्थांचा रोजगार बुडाला असून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांची लगबग सुरू
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांनी विविध रोपांच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, पेरू, चिकू, मसाल्यांच्या रोपांची विक्री सुरू झाली आहे. ही रोपे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
आंबा, काजू लागवडीकडे वाढता कल
लांजा : आंबा, काजू लागवडीकडे तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांचा कल प्रतिवर्षी वाढत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत लागवडीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असल्यानेच क्षेत्र वाढत असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.