पाचल : राजापूर तालुक्यातील करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळवडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात पहिल्या दिवशी १५० व्यक्तींना लस देण्यात आली़
या लसीकरण केंद्राचे उद्घाटन तळवडे गावचे सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सायली पाध्ये, आरोग्य सहायक टी. बी. पाटील, पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये, करक गावचे सरपंच सुरेश ऐनारकर, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, सुरेश गुडेकर, ग्राम कृती दलाचे अध्यक्ष संदीप बारसकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, ४ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पाचल परिसरात आणखी लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी परिसरातून करण्यात येत होती. प्रशासनाने या मागणीची दखल घेत तळवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात हे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आल्याने काही तासांतच हे लसीकरण फुल्ल झाले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. सायली पाध्ये व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना सेवा दिली.