चिपळूण : शहरातील खेंड कांगणेवाडी येथील गणेश मंदिरात मंगळवारी कोविशिल्ड लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी १५० नागरिकांनी या डोसचा लाभ घेतला. नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित या मोहिमेत कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला तसेच १८ वर्षांवरील नागरिकांनाही डोस देण्यात आला.
पीके तरारली
मंडणगड : सध्या सर्वत्र ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. रविवारपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. मघा नक्षत्रातील श्रावणसरींनी बळिराजा सुखावला आहे. पिकाला हे वातावरण पोषक असल्याने सध्या पिके तरारून आली आहेत. तसेच सध्या विविध फुलांचा बहर वातावरणाच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
पूरग्रस्तांना मदत
सावर्डे : जुलै महिन्याच्या अखेरीस चिपळूण तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुराने हाहाकार उडवून दिला. या नैसर्गिक आपत्तीत हजारो कुटुंबे बाधित झाली. या आपद्ग्रस्त कुटुंबांना चिपळूण तालुका नितीवंत भाविक गुरव ज्ञाती समाजाने मदतीचा हात पुढे केला आहे.
वैभवी सरफरेचे यश
रत्नागिरी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज नाणीजची विद्यार्थिनी वैभवी संतोष सरफरे हिने उज्ज्वल यश संपादन केले आहे. जिल्ह्यात तिने ५२ वा क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांनी कौतुक केले आहे.
जनावरांना पायलाग
खेड : तालुक्यातील तुळशी खुर्द येथे जनावरांना पायलागाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराचा धोका जनावरांना असल्याने आरोग्य विभागाने तातडीने लसीकरण मोहीम हाती घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.