लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली (मंदार गोयथळे) : अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे गुहागर तालुक्यातील लसीकरण कासवगतीने सुरु आहे. आजपर्यंत तालुक्यातील केवळ ४ हजार ६७२ इतक्या व्यक्तींनी लसीचे दोन डोस घेतले आहेत तर २२ हजार ३३२ व्यक्तींचा लसीचा पहिला डोस घेऊन झाला आहे.
गुहागर तालुक्याची लोकसंख्या १ लाख १० हजार ७२३ इतकी आहे. त्यामध्ये वय वर्ष १८वरील लोकसंख्या ९८ हजारपेक्षा जास्त आहे. त्यापैकी ४ हजार ६७२ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आजपर्यंत फक्त २७ हजार ४ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारतर्फे सातत्याने लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. आरोग्य विभागातर्फे गावागावात लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. तेथे लसीकरणाच्या दिवशी केंद्रावर लांबलचक रांगा दिसतात. मात्र, आरोग्य विभागाकडे ५०, १०० व जास्तीत जास्त २०० डोस उपलब्ध असतात. त्यामुळे रांगेमध्ये तिष्ठत राहूनही अनेकांना लस न घेताच परतावे लागते. कधी ऑनलाईन नोंदणी झालेल्यांना तर कधी ऑफलाईन नोंदणीधारकांना लस असे बदल केले जातात. या सगळ्यामुळे लसीकरणाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
कोरोना आपत्तीमध्ये आरोग्य सुविधांचा तुडवडा असल्याने तालुकावासीयांना ५० किलाेमीटर दूर चिपळूण, कामथे, डेरवण येथील रुग्णालयांचा आसरा शोधावा लागतो. त्यामुळे गुहागर तालुक्यामध्ये लसीकरणाचा वेग वाढण्याची आवश्यकता आहे.
--------------------------
गुहागर तालुक्यात व्हेंटिलेटर, आयसीयू सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय नाही, असा जिल्ह्यात फक्त गुहागर तालुका आहे. तरीही अन्य तालुक्यात लसीचे ४५० डोस तर त्याचवेळी गुहागर तालुक्याला फक्त १५० डोस येतात. ही सापत्नपणाची वागणूक जिल्हा प्रशासनाकडून का दिली जाते. कोरोनाच्या महामारीत गुहागरमधील जनतेचे हाल होतात हे दिसत नाही का? प्राधान्याने गुहागर तालुक्याचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.
- सचिन बाईत, तालुकाप्रमुख, शिवसेना