खेड : तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे जागतिक महामारी कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग मंदावला असून दररोजचे अपेक्षित लसीकरण होताना दिसत नाही. एका बाजूला तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा शतकी वाटचालीकडे सरकत असताना कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या फ्रंटलाईन असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रकार सुरू आहे.
खेड तालुक्यात एकूण दहा लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून, यापैकी नऊ ठिकाणी आठवड्यातून तीन वार लसीकरण करण्यात येत आहे. तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, खेड नगरपरिषद दवाखाना व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय अशा एकूण दहा ठिकाणी लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये जनतेसाठी करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यासारख्या रोगांनी त्रस्त असणाऱ्या ४५ ते ५९ या वयोगटातील आणि ६० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे.
तालुक्यातील ४५ ते ५९ या वयोगटात सुमारे ७७०० लाभार्थी असून, ६० पेक्षा अधिक वयाचे ३१४२३ असे एकूण ३९१२३ लाभार्थी आहेत. यामध्ये तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४५०७, फुरुस केंद्रात ५८४३, कोरेगाव ३२०४, आंबवली ४४३६, लोटे ५०२७, वावे ३३४०,शिव बु. ४००६, तिसंगी २३०० व खेड नगर परिषद अंतर्गत ६४६० लाभार्थ्यांचा समावेश आहे. ८ मार्चपासून कळंबणी उपजिल्हा रुग्णालय वगळता उर्वरित आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे व नगरपरिषद दवाखान्यात आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण करण्यात येत आहे. २४ मार्चपर्यंत झालेल्या तीन आठवड्यातील आठ दिवसांत तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय वगळता उर्वरित नऊ केंद्रामध्ये २९४५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. वास्तविक दररोज १०० लाभार्थी असे एकूण नऊ केंद्रात ७२०० लाभार्थ्यांना ही लस देणे अपेक्षित असताना उद्दिष्टाच्या केवळ ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.