रत्नागिरी : रत्नागिरीत २४ एप्रिल राेजी झालेल्या लसीकरण कार्यक्रमाचा आयोजक कोण? पूर्वनोंदणी करून लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण कारणीभूत असावे, असा आराेप भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केला आहे.
रत्नागिरी शहरातील एका मंगल कार्यालयात झालेले लसीकरण शासकीय होते? की गैरशासकीय आयोजन होते? शासकीय आयोजन असेल तर शासकीय यंत्रणेने ते जाहीर का केले नाही? लसीकरण विशिष्ट लोकांनाच उपलब्ध व्हावे, असा शासनाचा उद्देश होता का? असे प्रश्न अॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केले आहेत.
या लसीकरणात २०० नागरिकांना लस दिली गेली, पण आज ज्यांनी पूर्वनोंदणी केली होती त्यांना मात्र लस संपल्याने लसीकरण नाही, असे प्रसिद्ध करण्यात आले. नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीचा साठा बघूनच आजची वेळ दिली असणार, मग अचानक लस संपली, असे झाडगावसहित काही केंद्रांना का सांगण्यात आले. नागरिकांची गैरसोय कोणाच्या खपा मर्जीने झाली, असा प्रश्न अॅड. पटवर्धन यांनी केला.
ज्याठिकाणी लसीकरण झाले तो हॉल शासनाने ताब्यात घेतला होता का, सॅनिटाईज केला होता का? आयोजन गैरशासकीय असेल तर अन्य संघटना, पक्ष, संस्था यांनी मागणी केल्यास असे लसीकरण कॅम्प देणार का? तसेच पूर्वीच्या दोन शिबिरात दिली गेलेली लस सशुल्क देण्यात आली होती किंवा कसे? आयोजनाचे जाहीर प्रकटन शासनाने कुठे केले होतेे, लसीकरण केंद्राच्या प्रसिद्ध यादीत या मंगल कार्यालयाचा उल्लेख होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, असे अॅड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
लसीकरण आयोजनासंदर्भात काही निकष आहेत का? ते निकष डावलून आयोजन केले गेले का? या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लसीकरणाचे असे आयोजन मनमानी असून, यंत्रणेकडून लसीचा गैरवापर होत आहे असे वाटावे, अशी स्थिती असल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अस पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. तसेच केंद्र शासनाकडेही या संदर्भाने चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत अहवाल पाठवून करण्यात येईल, असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.