रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये सध्या सर्व शासकीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून, कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे व १ एप्रिलपासून ४५ वर्षांपासून सर्वांना सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत कोविड लसी दिल्या जाणार आहेत.
सदर लसी सुरक्षित असून, लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे व लसीची मागणी वाढत आहे. कोविड १९ लसीकरणानंतर आजाराची तीव्रता कमी दिसत असून, मृत्युदरही कमी झाला आहे.
सध्या महाराष्ट्रात दुसरी कोविडची लाट सुरू असूनही लसीकरणामुळे मृत्युदर कमी झाला आहे. सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, नियमित हात धुणे, गर्दी टाळणे इत्यादींचे काटेकोरपणे पालन करावे. स्वत:ची व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उपलब्ध असलेल्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. त्यामुळे लसीकरणाचा शंभर टक्के लाभ घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी यांनी केले आहे.