पाचल : राजापूर तालुक्यातील रायपाटण ग्रामीण रूग्णालयात दुसऱ्यांदा आलेली कोरोनाची लस अवघ्या काही तासातच संपल्याने शेकडो लाेकांना लसीविना घरी परत जावे लागले. परिसरातील ग्रामस्थांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
लस आल्याची महिती मिळताच सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लाेकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र, शंभर लाेकांना पुरेल एवढीच लस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य प्रशासनातर्फे फलकाद्वारे लाेकांना देण्यात आली होती. मात्र, तरी लाेकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. अखेर अवघ्या तासाभरातच ही लस संपल्याने लाेकांना लस न घेताच घरी परत जावे लागले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समाधान यांनी लसीचे योग्य पध्दतीने नियोजन करून लाेकांमध्ये लसीबाबत असलेले समज-गैरसमज दूर केले. आतापर्यंत सुमारे ३०० लाेकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती डाॅ. समाधान यांनी दिली.
यावेळी श्री वडजाई ट्रस्ट रायपाटण यांनी सामजिक बांधिलकीच्या माध्यमातून लाेकांची बसण्याची व्यवस्था करून मोफत अल्पाेपहाराची व्यवस्था केली होती. यावेळी रायपाटण गावचे सरपंच भोलानाथ गांगण, माजी सरपंच विलास गांगण, ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप नेवरेकर, किशोर गुरव, गोपीनाथ नवरे, प्रसाद पळसुले देसाई, कुणाल गांगण, प्रकाश पाताडे, मंगेश गोवंडे, नारायण राणे प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.