रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. रुग्ण संख्या वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासत आहे. एक नवे फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी शहरासह तालुकास्तरावर खाजगी डाॅक्टरांच्या सहकार्याने कोरोना सेंटरमध्ये उपचार उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, व्यापारी, टास्कफोर्स यांच्याशी बैठकीत चर्चा केल्यानंतर सांमत यांनी झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजकीय पक्षांच्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी आपल्या सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची दखल शासन व प्रशासन घेईल; परंतु कोरोनाच्या काळात सर्वांना एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात २०३८ बेड उपलब्ध असून त्यामध्ये ५३७ ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. येत्या आठ दिवसात ऑक्सिजन प्लांट जिल्हा रुग्णालयात सुरू केला जाईल, तोपर्यंत आवश्यक ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. औषधे,इंजेक्शन सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास महाविद्यालय, वसतिगृहे इतर इमारती ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.
व्यापाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याची दखल घेतली जाईल. व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून नका, असे आदेश दिले आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅम्प लावून लसीकरण केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास महाविद्यालये, वसतिगृहे व इतर इमारती ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करून ठेवले जातेय; परंतु असे रुग्ण घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रुग्ण स्वत:बरोबर इतरांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्याची दखल घेऊन वेळ पडल्यास कोरोनाबाधित सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.