असगोली : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाशी संलग्न सर्व कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी बुधवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याचा लाभ ३४४ जणांनी घेतला. प्रकल्पातील मेडिकल सेंटरमध्ये ५ स्वतंत्र कक्षांमध्ये लस देण्याची व्यवस्था तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागावर कोणताही अतिरिक्त ताण न येता, लसीचा एकही डोस वाया न जाता नियोजनबद्ध रितीने अवघ्या ५ तासात लसीकरण पूर्ण झाले.
रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पासह येथे कोकण एलएनजी, एल ॲण्ड टी या मोठ्या कंपन्यांसह अनेक छोट्या कंपन्या काम करत आहेत. या कंपन्यांमधील अनेकजण लस मिळावी म्हणून तालुक्यातील विविध लसीकरण केंद्रांवर जात होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने या कर्मचाऱ्यांना लस घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र लस मिळावी, अशी रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंता यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. त्याप्रमाणे केवळ आरजीपीपीएल कंपनीसाठी कोविशिल्डचे ३०० डोस प्राप्त झाले.
लसीकरणाचे नियोजन मनुष्यबळ खात्याचे अधिकारी अमित शर्मा, आशिष पांडे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी युवराज इंजे यांनी केले. कंपनीच्या मेडिकल सेंटरमध्ये लसीकरणासाठी तीन कक्ष स्थापन करण्यात आले. सकाळी ९ वाजता कंपनीच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नोंदणी आणि लसीकरणाला सुरुवात केली. ३ कक्ष अपुरे पडू लागले. त्यामुळे आणखी दोन कक्ष वाढविण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत आरजीपीपीएल आणि संलग्न कंपन्यांमधील ३३८ कर्मचारी आणि कुटुंबियांनी पहिला डोस, तर ६ जणांनी दुसरा डोस घेतला. लसीकरण सुरु असताना व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंता यांनी भेट देऊन या मोहिमेची माहिती घेतली.