रत्नागिरी : लस संपल्याने शनिवारी, रविवारी लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. ५ ,९३० लसी जिल्ह्यासाठी येणार असून सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी ३ लाख लसींची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
संपूर्ण देशात लसीकरण सुरू असून, आतापर्यंत कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९ आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत १४,५६० इतके रुग्ण सापडले आहेत. त्यातील ११,४२९ रुग्ण बरे झाले असून, ४२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १,१५,९०३ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोविड लसीकरण सत्रे घेण्यात आली आहेत.
कोविड लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. हे डोस योग्य कालावधीनंतर घेऊन लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
लसीमुळे मृत्यूचा धोका टळतो
कोविड लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते व मृत्यूचा धोका टळतो. लस घेतली म्हणजे कोविड आजारापासून आपण सामान्य माणसाप्रमाणे १०० टक्के सुरक्षित झालो असे नाही. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.