चिपळूण : नोकरी, कामानिमित्त व परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना प्राधान्याने लस मिळावी, यासाठी येथील नगर परिषदेकडून ५ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत लसीकरणाचे आयोजन केले आहे.
परदेशात जाणाऱ्या शहरातील अनेकांना लस घेण्यासाठी अन्य तालुक्यात जावे लागत आहे. मात्र, चिपळुणातील आरोग्य विभागाने याबाबत कोणतेही नियोजन केले नव्हते. रमजान ईद किंवा सुट्टीवर आलेले अनेकजण परतीच्या प्रवासाला जाणार असल्याने त्यांना लस मिळणे गरजेचे होते. त्यासाठी स्वतंत्र लसीकरण करावे, अशी मागणी चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी, नगरसेवक आशिष खातू, खालिद दाभोळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली होती. त्याची दखल घेत चिपळूण नगर परिषदेने या लसीकरणाचे आयोजन केले आहे. लसीकरणाला येताना पासपोर्ट, व्हिसा कॉपी तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखपत्र घेऊन येण्यात यावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.