चिपळूण : शहरातील ४५ वर्षांपुढील सर्व दिव्यांग व्यक्तिंना लसीकरणातील पहिला डोस देण्याची मागणी करण्यात येत हाेती. आरोग्य विभाग व येथील नगर परिषद प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून, येत्या दोन दिवसांत त्यांचे लसीकरण सुरू होणार आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शहरामध्ये एल टाईप शॉपिंग सेंटर येथे दोन व पोलीस वसाहतीमधील हॉलमध्ये एक अशी एकूण तीन लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर व त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. ते काम अद्याप सुरूच आहे. याबरोबरच ४५ ते ५ ९ वयोगटावरील आणि आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचेही लसीकरण केले जात आहे. तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंनाही प्राधान्य देऊन लस देण्यात यावी, अशी मागणी गेले कित्येक दिवस होत होती. त्याची दखल घेत शहरातील ४५ वयोगटावरील सर्व दिव्यांग व्यक्तिंना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर डोस उपलब्ध होणार असून, अधिक माहितीसाठी चिपळूण नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केले आहे.