दापाेली : विदेशात नाेकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिकांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेऊन दापाेली नगर पंचायतीने त्यांच्यासाठी लसीकरणाचे नियाेजन केले हाेते. त्यानुसार तब्बल २०० जणांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणामुळे विदेशात जाण्याचा त्यांचा मार्ग माेकळा झाला.
विदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना लस अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, लसीचा पुरवठा कमी हाेत असल्याने वेळेवर लस मिळत नाही. लस नसल्याने अनेकांचे विदेशात जाण्याचे मार्ग बंद झाले हाेते. परंतु, महाराष्ट्र शासनाने विदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या लोकांना तत्काळ लस उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दापाेली नगर पंचायतीने नियाेजन केले हाेते. हे लसीकरण सुलभ व्हावे, यासाठी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे तसेच ऑफलाईनही अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आपोआपच आटोक्यात आली आहे. तसेच नगर पंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम अधिक सुलभ केली आहे.
--------------------------
शासनाच्या सूचनांचे पालन करून दापोली नगर पंचायत लसीकरणाचे नियोजन करत आहे. नगर पंचायतीला लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे योग्य नियोजन करून सगळ्यांना लस दिली जाईल. तसेच १८ ते ४४ किंवा ३० ते ४५ व ६० वर्षांवरील कोणताही व्यक्ती लसीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी दापोली नगर पंचायतीने घेतली आहे. दिव्यांग व्यक्तीलाही सहज लस उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, दापोली नगर पंचायत