गुहागर : तालुक्यात काही दिवसांतच १२५ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असताना सात लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा संपल्याने बुधवारपासून लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.
तालुक्यात गुहागर ग्रामीण रुगणालय व वेळंब उपकेंद्रासह हेदवी, आबलोली, कोळवली, तळवली, चिखली या पाच प्राथमिक केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मंगळवारपर्यंत ११३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. यात काल रात्री आणखी १२ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंतची रुग्णसंख्या १२५ झाली आहे. यामधील नाजूक स्थितीतील काही रुग्णांना कामथे रत्नागिरी व पुणे येथे ठेवले असून बहुतांशी रुग्णांना होम क्वॉरंटाईन ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत लसीकरणाची गती वाढविण्यात आली होती. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने व लसीकरणासाठी ४५ वर्षांपुढील सर्व लोकांना पात्र ठरविल्याने लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशातच गेले दोन दिवस लसीचा नव्याने पुरवठा न झाल्याने मंगळवारी सातही केंद्रांवरील लस संपत आली होती. यामधील आबलोली केंद्र मंगळवारी बंद ठेवले होते. दापोली येथून तातडीने १५० लसीचा साठा मागविल्याने अन्य केंद्रे चालू राहिली. बुधवारी दुपारपर्यंत चिखली केंद्रावर राहिलेल्या लसीचा साठा संपल्यानंतर सर्वच केंद्र बंद करण्यात आली.
पुरवठाच नाही
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी देवीदास चरके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातूनच लसीचा पुरवठा बंद झाला आहे. तो केव्हा केला जाईल, याची कोणतीही माहिती वरील पातळीवरून आम्हाला दिलेली नाही. लस केंद्रावर उपलब्ध होईपर्यंत लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत.