मंडणगड : लसीकरणासाठी ऑनलाईन नाेंदणी आवश्यक करण्यात आली आहे़ मात्र, या नाेंदणीत ठिकाणाचे काेणतेही बंधन नसल्याने काेणीही व्यक्ती काेठेही जाऊन लस घेत असल्याचे प्रकार समाेर येत आहेत़ मंडणगड तालुक्यासाठी ६०० लसीची मात्रा उपलब्ध झाली़; पण या लसीपासून स्थानिकच वंचित राहिल्याचे दिसून आले़ तालुक्यात लस येताच दापोली, खेड, महाड, मुंबई, पुणे येथील नागरिक ही लस घेऊन गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ परजिल्ह्यातील व्यक्ती तालुक्यात येत असल्याने काेराेना संसर्गाचा धाेका वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण अभियानास गती मिळत असताना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या अभियानात वय वर्षे १८ ते ४४ व ४५ पासून पुढे असा बदल करण्यात आला. या अनुषंगाने लसीकरणाकरिता नव्याने आलेला ऑनलाईन नोंदणीचा निकष तालुक्यासाठी डाेकेदुखी ठरत आहे़ तालुक्यातील कुंबळे, मंडणगड, पंदेरी देव्हारे या गावातील लसीकरण केंद्रांवर ६ मे २०२१ रोजी १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी प्रत्येकी १५० याप्रमाणे ६०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते़ या लसीकरणासाठी मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून आगावू नोंदणी झालेली होती़ त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होती; पण त्यात स्थानिकांची उपस्थिती अर्धा टक्का इतकीच हाेती़ या लसीकरणासाठी दापोली, खेड, महाड, मुंबई, पुणे, आदी ठिकाणांहून माणसे मंडणगड तालुक्यात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण पसरले हाेते. तालुक्यात येणाऱ्या या व्यक्तींची काेराेना चाचणी झाली आहे का, त्यांना तालुक्यात प्रवेश कसा देण्यात आला, असे प्रश्न तालुकावासीयांनी उपस्थित केले आहे़
लसीकरणासाठी मंडणगड तालुक्यात बाहेरून कुंबळे गावात दाखल होणाऱ्या व्यक्तीची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडक तपासणी केली जाणार आहे. गावात दाखल होणाऱ्या व्यक्तीकडे ई-पास आहे का, कोविड चाचणी केली आहे अथवा नाही याची खातरजमा केली जाणार आहे. आरोग्य विभागाने लसीकरण अभियानात स्थानिकांना जास्तीत जास्त अग्रक्रम द्यावा.
- किशोर दळवी, सरपंच, कुंबळे ग्रामपंचायत़