रत्नागिरी : तीन वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी बतावणी करून सत्तेवर आलेल्या भाजपच्या राज्यात सध्या सामान्य माणसाला साधा वडा-पावही परवडेनासा झाला आहे. अच्छे दिन काही आले नाहीत. महागाईचा आगडोंब उसळला. प्रत्येकाच्या मनात त्यामुळे चिड निर्माण झाली आहे. महागाईची ही बुलेट ट्रेन रोखण्यासाठी शिवसेनाही जनतेबरोबर रस्त्यावर उतरली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी येथे केले. शिवसेनेतर्फे महागाईविरोधात महिलांचा मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
राज्यात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर महागाईविरोधात शिवसेनेने राज्यभरात मोर्चा, आंदोलन सुरू केले आहे. रत्नागिरीतही गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन महागाईविरोधात निवेदन दिले. माळनाका येथील मराठा मैदानातून महिलांच्या मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविण्यात आला. यावेळी महागाईविरोधात व सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मोर्चाआधी मराठा मैदानात सेना महिलांचा मेळावा झाला. त्यावेळी महागाईविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार सामंत म्हणाले की, महागाईने जनता त्रस्त आहे. महिलांच्या मनात आक्रोश व डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळे महागाईच्या विरोधात भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन उभारण्याची गरज आहे.
जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक म्हणाले की, मोदी सरकारच्या नोटबंदीमुळे सामान्य जनतेलाच फटका बसला आहे. नोटबंदीमुळे काहीच साध्य झालेले नाही. तर महागाईविरोधात सर्वांनी एकजुटीने या शासनाविरोधात लढूया, असे महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या. कांचन नागवेकर यांनीही महागाईविरोधात भाजप सरकारवर टिका केली.