खेड/दापोली - बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पुलाला बांधून ठेवल्याप्रकरणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह दोन जणांना खेड पोलिसांनी आज मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यांना दापोली पोलीस स्थानकात ठेवण्यात येणार असून, उद्या बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता बामणे आणि गायकवाड यांना खेडमधील जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या रेलिंगला बांधून ठेवण्यात आले होते. सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे अटक झाल्यानंतर खेडमध्ये कारवाई होणार का, असा प्रश्न केला जात होता.या प्रकरणी वैभव खेडेकर यांनी खेड सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यावर मनसेचे नेते वैभव खेडेकर, विश्वास मुधळे व संतोष पवार यांना अटक करण्यात आली. आजची रात्र त्यांना दापोली येथील पोलीस स्थानकात ठेवले जाणार आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दापोली कारागृहाबाहेर एकच गर्दी केली होती.जनतेच्या हितासाठी काम करत असताना असे 100 गुन्हे देखील आम्ही अंगावर घेऊ असे वैभव खेडेकर यांनी सांगितले. दरम्यान कोणीही बंद पाळून जनतेला त्रास होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन खेड मनसेकडून करण्यात आले आहे.
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 7:46 PM