आबलोली : आपल्या समृध्द संस्कृतीचा वारसा आजच्या आधुनिक युगातही जोपासताना गुहागर तालुक्यातील आबलोली-पागडेवाडी येथील अबालवृध्दांनी वाघबारशीची परंपरा गावातून वाघरु.... वाघरु... ओरडत वाघ पिटाळत कायम ठेवली आहे.कार्तिक शुक्ल १२ या दिवशी गावातील अबालवृध्द एकत्र येतात. काही तरुणांना वाघाचे मुखवटे, रंगभूषा करुन सजविले जाते. शेपट्या लावल्या जातात. अंगावर पट्टे ओढले जातात आणि या वाघांना गावातून पिटाळले जाते. त्यासाठी शेण, मातीचे गोळे करुन वाघांच्या अंगावर मारले जातात. वाघांना पिटाळत गावच्या सीमेबाहेर नेले जाते.
शेतीची कामे आटोपल्यानंतर निवांत झालेला बळीराजा या परंपरा जोपासताना उत्साहित होतो. शेतकापणी झाल्यामुळे गुरेसुध्दा मोकळी सोडली जातात. त्यांच्या पाठीवर गुराखी नसतो. पावसाळ्यात गुरे राखताना गुराखी एका निवांत ठिकाणी आपली गुरे थांबवितात. त्या जागेस ‘गोठण’ म्हणतात. आपली चटणी-भाकरी खातात. गुराख्यांच्या देवाला म्हणजेच जंगलदेवाला त्यातीलच भाकरी-चटणी ठेवतात आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
जंगलदेवाने मोकळ्या सोडलेल्या आपल्या गुरा-ढोरांचे रक्षण करावे, जंगली श्वापदांपासून रक्षण करावे, असे गाºहाणे घातले जाते. वाध पिटाळून गावचे, गुरा-ढोरांचे रक्षणाचे आर्जव केले जाते. पिटाळत आणलेले वाघ त्यांचे सहकारी शेवटी नदीवर येतात. स्रान करतात. तांदूळ-गुळाची बनविलेली खीर जंगलदेवाला दाखवितात. वाघांना खाऊ घालतात व सर्व सहकारी खातात. आजच्या एकविसाव्या शतकातही युवा पिढी ही परंपरा जोपासत आहे. हीच तर खरी आपल्या प्रगल्भ संस्कृतीची शिकवण आहे. वाघबारशी दिवशी सायंकाळी तुलसीविवाह पार पडतात.