आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १३ : ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बुधवारी जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १४५ विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून हे शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर तीन टप्प्यात घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात सहज सोपी जात प्रमाणपत्र पडताळणी याविषयी माहिती देण्यात आली. १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी अर्ज कसा भरावा, कोणत्या कालावधीत भरावा, जात पडताळणी प्रस्तावसोबत कोणती कागदपत्रे द्यावीत, वंशावळ प्रतिज्ञापत्र कसे सादर करावे, अन्य राज्यातून आलेल्यांना वैधता प्रमाणपत्र मिळते का, आदी प्राथमिक माहिती जात पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी देतानाच या विद्यार्थ्यांंचे शंकानिरसनही केले.
सरकारी कागदपत्रांमध्ये कोणताही अनधिकृत बदल करू नये, शैक्षणिक विषयक अजृ सादर करताना शासकीय शुल्क १०० रूपयांव्यतिरिक्त कोणतेही अधिक शुल्क या समितीकडून आकारले जात नाही. तसेच त्रयस्थ व्यक्तीमार्फत अर्ज सादर करू नये, असे मार्गदर्शन उपायुक्त जाधव यांनी केले.दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यातील त्रुटींविषयी माहिती देण्यात आली. परिपुर्ण अर्ज स्वीकारून त्यांची प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात या मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सचिन पेडणेकर, पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)