खेड : तालुक्यातील सात्विणगाव येथील वनविभागाच्या आरक्षित जंगलाला बुधवारी दुपारी लागलेल्या वणव्यात जवळपास ४५० एकर विस्तृत जंगलातील झाडे जळून खाक झाली आहेत. वणव्याचे रौद्ररूप असूनही ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली तर उपलब्ध असलेल्या साधनांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
या जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक लहान प्राणी आणि सरपटणारे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या वर्षातील अशा प्रकारे वणवा लागण्याची ही तिसरी घटना असून वनविभागाच्या वतीने सतत लागणाऱ्या वणव्यांना रोखण्यासाठी काहीही उपाययोजना आतापर्यंत केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जंगलात लागलेल्या आगीची माहिती ग्रामस्थांनी लोटे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात देऊन अग्निशामक बंबाला पाचारण केले. तोपर्यंत या ग्रामस्थांनी सुमारे तीन ते चार तास ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक ग्रामस्थ व लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक बंबाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून सुमारे पाच तासांनी ही आग नियंत्रणात आणली मात्र तोपर्यंत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
--------------------
खेड तालुक्यातील सात्विणगाव येथील वनविभागाच्या राखीव जंगलाला लागलेल्या भीषण वणव्यात अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.