रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळावेत, या मागणीसह नव्याने सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला खेड स्थानकात थांबा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे खेडवासीय प्रवासी जनतेने समाधान व्यक्त केले आहे.सावंतवाडी दिवा एक्स्प्रेस, रत्नागिरी दिवा पॅसेंजर, तुतारी, कोकणकन्या, मांडवी तसेच नेत्रावती एक्स्प्रेस अशा ठराविक गाड्याच खेड स्थानकावर थांबत आहेत. त्यामुळे या स्थानकावर अवलंबून असलेल्या खेडसह दापोली, मंडणगड तसेच रायगडमधील रत्नागिरी जिल्ह्याला जवळ असलेल्या भागातील प्रवासी जनतेची मोठी गैरसोय होत होत आहे. यासाठी जल फाउंडेशन, तसेच कोकण विकास समिती यांच्या माध्यमातून खेड स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयी दूर होण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. नव्याने सुरु होणाऱ्या या गाडीला खेड स्थानकात थांबा दिला जावा, यासाठी पाठपुरावा केला जात होता. त्याला अखेर यश आल्याचे निश्चित झाले आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित थांब्याबाबत जी माहिती मिळाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीसह खेड थांब्याचा समावेश करण्यात आला आहे. खेडसह लगतच्या तालुक्यांसाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.
फलाट क्रमांक २ चा विस्तारखेड स्थानकावर प्रवासी जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोकण रेल्वेने काही सकारात्मक दिशेने पावले उचलली आहेत. खेड स्थानकावरील फलाट क्रमांक दोन चा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठीची निविदाही कोकण रेल्वेने ३० मे रोजी प्रसिद्ध केली आहे. या कामासाठी ऑनलाइन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक २१ जून २०२३ आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ही निविदा ऑनलाईन सादर करावयाची आहे.