रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची आज, मंगळवारी मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली, मात्र तेजस एक्स्प्रेस ही जर्मन बनावटीची आहे. त्याच मार्गावर आता भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस नेमकी कधी धावणार, याची गेले अनेक महिने प्रवाशांना उत्सुकता होती. यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली होती. देशभरातील विविध मार्गांवर ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे ५:३५ वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटून गोव्यात मडगावला दुपारी २:३० वाजता पोहोचणे अपेक्षित आहे.