दापोली : येथील न. का. वराडकर कला रा. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तक खेडे म्हाळुंगे येथील कदमवाडीमध्ये रेन हार्वेस्टिंगबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी एफ. के. मगदुम म्हणाले की, आजघडीला आपल्याला पाण्याचे महत्त्व समजत आहे. त्यादृष्टीने पाणी साठवून ठेवणे गरजेचे आहे की, ज्याचा वापर आपल्याला उन्हाळ्यात करता येईल. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वक एल. पी. पाटील यांनी रेन हार्वेस्टिंग सिस्टीम या गावी सुरू करून नवीन आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक व्ही. टी. कमळकर यांनी भविष्यात पाण्यासाठी तिसरे युद्ध जर टाळायचे असेल तर ही पद्धत सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे, असे सांगितले. वाडीचे अध्यक्ष अशोक कदम यांनी आभार मानले. तुम्ही दिलेली माहिती आपल्याला भविष्यासाठी उपयोगी आहे, असे सांगत सुभाष कांगणे यांनीही या योजनेचे कौतुक केले. मारुती नाचरे यांनीही पाण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी रामचंद्र गोरिवले, बाबू कदम, अशोक कदम, अनंत कदम, हरिश्चंद्र येसरे, चंद्रकांत कदम, भालचंद्र येसरे, रमेश कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना ऑडिओ, व्हिडीओद्वारे रेन हार्वेस्टिंग सिस्टीम चित्रफीत दाखविण्यात आली. प्रा. विशाल वैराट यांनी सर्वांचे आभार मानले.