रत्नागिरी : गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अनेक बागायतदारांनी आंबातोड केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून २५ हजार आंबापेट्या आज वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आंब्याची आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. १२०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे ७२.६३ टक्के नुकसान झाले. पावसापासून वाचलेला परंतु तयार झालेला आंबा शेतकऱ्यांनी पाठवण्यास प्रारंभ केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी मार्केटला आंब्याची आवक वाढत आहे. गत आठवड्यात दिवसाला १२ हजारपेट्या विक्रीला येत होत्या. उष्मा वाढल्याने आंबा तयार होऊ लागला आहे. परिणामी मार्केटमधील आवक वाढू लागली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. मात्र, आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला. दुसऱ्या आठवड्यात १५०० ते ४००० रूपये इतका दर आंबापेटीला प्राप्त झाला. गुढीपाडव्याला सर्रास शेतकऱ्यांनी आंबा तोड केल्याने आवक वाढली आहे. परिणामी दर आणखी खाली आले आहेत. वाहतूक खर्च, हमाली, दलाली, शिवाय आंबा पिकासाठी येणारा खर्च वजा जाऊन शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. शिवाय आंब्याचा दर्जाही सुधारला आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानंतर आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढते. आंब्याच्या पेट्यांची आवक वाढल्याने दर खाली आला आहे. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी अद्याप प्रमाण निम्मे आहे. एप्रिलमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसामुळे परिणाम झाल्याने आंबापीक धोक्यात आले. अवकाळीमुळे ७० टक्के पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, गतवर्षीपेक्षा यावर्षी दर खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाचा विचार करता आंबा पिकाचा दर स्थिर राहणे अपेक्षित आहे. आवक वाढल्याने दर खाली आणणे चुकीचे आहे. खते घालण्यापासून मोहोर आल्यानंतर कीटकनाशके फवारणीसाठी करण्यात येणारा खर्च, वाढता इंधनखर्च, मजूरी खर्च, पॅकिंगसाठी लागणारा खोका, वाहतूकखर्च, हमाली, दलाली वजा जाऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येते. आंबा पिकासाठी बँकांचे घेतलेले कर्ज फेडता येईल का, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. (प्रतिनिधी)
वाशी मार्केटमध्ये २५ हजार आंबापेट्या दाखल
By admin | Published: March 22, 2015 12:29 AM