सचिन मोहिते देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून लवकरच या स्मारकाला झळाळी मिळणार आहे. तसेच जाधव यांच्या पराक्रमाची गाथा तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.भारत सरकारकडून एखाद्या शूरवीरांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी वीरचक्र मिळणे ही फार मोठी दुर्मिळ बाब आहे. आणि हे अभिमानास्पद असणारे वीरचक्र पदक संगमेश्वर तालुक्यातील ६००-६५० लोकवस्तीच्या असणाऱ्या छोट्या बामणोली गावातील पराक्रमी सैनिक हवालदार कै. धोंडूजी गोविंद जाधव यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले होते. त्यांनी १९४७-४८ साली झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या काश्मीर युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती व्हि. व्हि गिरी यांच्या शुभ हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्याचबरोबर आदरणीय धोंडूजींना १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.भारत भूमीवर प्राणाची बाजी लावून शौर्य गाजवणाऱ्या या सुपुत्राचे स्मारक गावामध्ये आहे. यामध्ये हवालदार धोंडूजी जाधव यांचा चौथर्यावर बसविलेला अर्ध पुतळा, त्यांच्या पराक्रमाची माहिती आणि पत्र्याची शेड याचा समावेश आहे. स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. दि. २५ ऑगस्टला झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मारकाच्या सुशोभीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. याची जबाबदारी गावकऱ्यांबरोबरच श्री. भागवत व त्यांच्या समितीने देखील घेतली आहे. यासाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतीस्थळ रत्नागिरी जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्व हुतात्मा झालेल्या जवानांचे दे.शी.प्र. मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये स्मृतीस्थळ उभारणे. पाकिस्तान, चीन विरुद्धच्या युद्धांमध्ये रक्षण करताना स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण ४४ पराक्रमी शूरवीर सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्याचे स्मरण व्हावे आणि त्यातून त्यांनी सतत प्रेरणा घ्यावी या उद्देशाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने या सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतिस्थळ संस्थेच्या शहीद जवान स्मारकामध्ये बनविण्याचा संकल्प केला आहे. या स्मृतीस्थळामध्ये संगमरवरी दगडावर कोरलेल्या सर्व हुतात्मा जवानांची नावे, हुद्दा, वीरमरण दिनांक असलेल्या नामपाट्या, आदरांजली वाहण्याकरता संगमरवरी कट्टा, प्रकाश व्यवस्था आदि गोष्टींचा समावेश आहे. याचा अंदाजे खर्च रुपये २ लाख अपेक्षित आहे.
बामणोलीतील वीरचक्र विजेते हवालदार धोंडू जाधवांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी
By मनोज मुळ्ये | Published: October 04, 2023 3:41 PM