लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. त्यामुळे दरात चढ-उतार अद्याप कायम आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना संकटाबरोबर वाढत्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्य जनता पोळून निघत असून, दरवाढीवर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे.
भाज्यांची आवक घटल्याने उपलब्धताही कमी आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटो २० रूपये किलो दराने विकण्यात येत होते, मात्र या आठवड्यात ३० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर कमी झाले असून, २० ते २५ रूपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. फरसबी १०० ते १२० रूपये तर भेंडी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडीची २० ते २५ रूपये दराने विक्री सुरू आहे. कांदा २५ ते ३० रूपये किलो दराने विकला असण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होत असून, आवक रोडावल्याने दरावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाजारात पालेभाज्यांची कमतरता भासत आहे. गावठी भाज्या गायब असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची विक्री सुरू आहे. मेथी, पालक, शेपू, माठ आदी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पालेभाज्यांची जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीरची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे.
आषाढी एकादशीला काही दिवस शिल्लक असले तरी बाजारात रताळी विक्रीला आली आहेत. ४० ते ६० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री सुरू आहे. रताळ्यांना वाढती मागणी आहे.
फरसबी १०० ते १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. घेवडा ७० ते ७५ रूपये, सिमला मिरची ७० रूपये, गाजरची ६० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. लिंबू दहा रूपयांना चार नग विकण्यात येत आहेत. भाज्यांच्या वाढत्या दराने ग्राहक हैराण झाले आहेत.
कडधान्य, डाळींच्या किमती भडकलेल्या असतानाच भाज्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्य जनता मात्र यात होरपळून निघत आहे. कोरोना संकटाबरोबरच महागाईत जनता भरडली जात आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक राजकीय पक्षांना नाही. निवडणूक काळात आमिषांचा पाऊस पाडणारे नेते सध्या गायब आहेत.
- प्राजक्ता शिंदे, गृहिणी
भाज्या, कांदा-बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे. महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे.
- शर्मिला राठोड, गृहिणी