राजापूर : रस्त्याच्या बाजूला जेवण करण्यासाठी बसलेल्या कुटुंबांवर कंटेनरचा फाळका पडून झालेल्या अपघातात भाजी विक्रेते निखिल पोपट साळुंखे (वय ३२, रा. आष्टा, सांगली) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ (रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला झाला.
या अपघाताची माहिती उज्ज्वला भारत सरगर (२५) यांनी पाेलिसांना दिली. राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील भाजी विक्रेते कुटुंब जेवण करण्यासाठी महामार्गाच्या बाजूला बसले होते. याच दरम्यान महामार्गावर गोव्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एचआर ५५, वाय ६१०८) चालला होता. हा कंटेनर कादीर शौकत अली (३६, रा. तिलजा, ता. समरीयाना, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) हा चालवीत होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि उन्हाळे येथील अवघड वळणावर कंटेनरला अपघात झाला. त्यावेळी कंटेनरचा फाळका तुटला व तेथे तो जेवत असलेल्या कुटुंबाच्या अंगावर जाऊन पडला. अचानक घडलेल्या प्रकाराने जेवत असलेल्या मंडळींना आजूबाजूला पळण्याचीही संधी मिळाली नाही. त्या फाळक्याच्या माराने भाजी विक्री करणारे निखिल पोपट साळुंखे हे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या पायाला फॅक्चर झाले आहे.
अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यावेळी निखिल साळुंखे हे मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक कादीर शौकत अली याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.
...........................................
अनेक वर्ष विना अपघात प्रवास
नकुशा या गेली अनेक वर्ष सांगली येथून स्वतः बोलेरो पिकअप भाजी भरून घेऊन कोकणात येऊन त्याची विक्री करतात. त्या स्वतः गाडी चालवितात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत कधीही अपघात केलेला नाही. मात्र, या विचित्र अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूरकडे हलविण्यात आले आहे. कंटेनर चालक कादीर शौकत अली याला रत्नागिरीमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
...................................
दाेन दिवसांपूर्वी राजापुरात
सांगलीतील हे कुटुंब भाजी विक्रीसाठी काेकणात येतात. राजापूर येथे दाेनच दिवसांपूर्वी ते भाजी विक्रीसाठी आले हाेते. सायंकाळी काम आटाेपून ही मंडळी सांगलीकडे जाण्यासाठी निघाली हाेती. मात्र, रात्र झाल्याने त्यांनी येथेच जेवण उरकून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते रस्त्याच्या बाजूला बसले हाेते. मात्र, रस्त्यावरून जाणारा कंटेनर त्यांच्यासाठी काळ बनून आला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.