लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने फळांबरोबर सुका मेव्यालाही वाढती मागणी आहे.
गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येत असल्यामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. किराणा मालाच्या दुकानांतून तेल, साखर यासाठी विशेष मागणी होत आहे. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून पूजेचे स्वरूप घरगुती ठेवण्यात येत असले तरी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मोदकाचे तयार पीठ, गूळ, वेलची यासह प्रसादासाठी साखर फुटाणे, खडीसाखर, सुका मेवा यांची खरेदी सुरू आहे.
बाजारात सध्या सर्वप्रकारच्या भाज्या व फळे मुबलक स्वरुपात उपलब्ध आहेत. बहुतांश भाज्या ६० ते ७० रुपये, फळांचे दर १०० ते २५०च्या घरात आहेत. देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
गावठी भाज्यांसह काकडी, चिबूड, दुधी भोपळे बाजारात उपलब्ध आहेत. मुळा, माठ पालेभाज्यांसह भेंडी, कारली, गवार, पडवळ, दोडके, वालीच्या शेंगा, दुधी भोपळा विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांकडून गावठी भाज्यांची प्राधान्याने खरेदी केली जात आहे. चिबूड, काकडी नगावर विक्री होत असली तरी आकारानुसार दर सांगण्यात येत आहेत.
बाजारात कांदा २५ ते ३० रुपये तर बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा शंभर रुपयांना पाच किलो दराने विकण्यात येत आहे. लसूणची विक्री ५० रुपये किलाेने सुरू आहे.
बाजारात देशी सफरचंद मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकाराने लहान असलेली सफरचंद ६० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असून, सफरचंदासाठी वाढती मागणी आहे.
भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतो. गावठी भाज्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने सध्यातरी दर नियंत्रणात आहेत. मात्र, अजून दर खाली येण्याची आवश्यकता आहे. शेतकरी भाज्या, टोमॅटोला दर मिळत नसल्याने रस्त्यावर फेकत असताना, आमच्या शहरात मात्र दर भरमसाठ आहेत. दरावर नियंत्रण नसल्यामुळेच एकप्रकारे ग्राहकांची लूट सुरू आहे.
- ऋतुजा शिंदे, रत्नागिरी
एकीकडे शेतकरी दर मिळत नसताना आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे मात्र व्यापारी भाज्यांचे दर भरमसाठ आकारून ग्राहकांची लूट करत आहेत. कांदा-बटाट्याचे दर अद्याप अनियंत्रित आहेत. भाज्याही ५० ते ७० रुपयांच्या घरात आहेत. डाळी, कडधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे ग्राहकांची फरपट होत आहे. दरावर नियंत्रणाची गरज आहे.
- प्रणाली पाटील, रत्नागिरी