रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी-चाफे वळणावरील खड्डे चुकविताना तोल जाऊन अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला उलटण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. निवळी-जाकादेवी-खंडाळा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालक, प्रवासी, ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जात आहेत.
आज लाक्षणिक संप
चिपळूण : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी शुक्रवारी, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप करणार आहेत. मोबाइल वापसी आंदोलन यशस्वी झाल्याने अंगणवाडी कर्मचारी सभेने हा निर्णय घेतला आहे. मोबाइलने काम थांबले असले तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नियमित काम सुरू ठेवले आहे.
बेकायदा बांधकामाला दिलासा
दापोली : तालुक्यातील मुरुड बहिरीचा कोंड येथे गावठाण भागात केलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्यात दापोली प्रशासनाकडून पावसामुळे स्थगिती देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.
रस्ता दुरुस्तीची मागणी
राजापूर : तालुक्यातील सागवेनजीकच्या पाल्येवाडी थांबा ते पाल्येवाडी या दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, मुंबईतील शिवसेनेचे रिक्षा संघटनेचे नेत आणि सागवे विभाग उपसंपर्कप्रमुख विद्याधर पेडणेकर यांनी खासदार विनायक राऊत यांना हे निवेदन सादर केले.
मुसळधार पाऊस
चिपळूण : गेले चार-पाच दिवस हवामान खात्याने अतिदक्षतेचा इशारा दिल्यानुसार बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मुसळधार पावसामुळे चिपळूण नगर परिषदेतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी : गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वाटद जिल्हा परिषद गटातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बेंद्रे हे आपल्या आई एंटरप्रायझेसच्या माध्यमातून करत आहेत. या वर्षी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले आहे.