रत्नागिरी : स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन त्याचा फायदा तेथील शेतकºयांना होणार आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात स्वच्छतेवर भर देत असतानाच ग्रामीण भागातील जीवन रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कचºयाचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींमध्ये गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे़ त्यासाठी गावातील कचरा एकत्रित करुन हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत़ याबाबतचे प्रशिक्षणही या निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह गटविकास अधिकारी , विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेले आहे, त्यासाठी त्यांना कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायत आणि सातारा तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायत येथे दौराही आयोजित करण्यात आला होता़ त्या निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत़ त्यादृष्टीने सरपंचांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे़
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून गांडूळ प्रकल्पांबाबत गावातील ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. या प्रकल्पाला ग्रामसभांमध्येही उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षामार्फत पुढील काळात अवश्यक असणारी तांत्रिक माहितीही देण्यात येणार आहे. या गांडूळ प्रकल्पांमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकरी, बागायतदारांना सेंद्रिय खत उपलब्ध होऊन त्याच्या वापराने मोठा फायदा होणार आहे.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन माध्यमातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणाºया ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे.
तालुका ग्रामपंचायतींची संख्या
मंडणगड १
दापोली ५
खेड ११
चिपळूण १०
गुहागर ४
संगमेश्वर ९
रत्नागिरी १०
लांजा २
राजापूर ५
एकूण ५७