रत्नागिरी : राजकीय मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. जिल्ह्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरु असताना खेडमध्ये भलताच राजकीय शिमगा पाहायला मिळाला. रंगपंचमीदिवशी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी घातलेल्या कुर्त्याची भलतीच चर्चा सुरु होती.कुर्त्यावर लिहिलेल्या ‘व्हेरी गुड...व्हेरी गुड, किरीट सोमय्या आला का?’ ने साऱ्यांचेच लक्ष वेधले आणि या कुर्त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली होती.दापोलीतील कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना नेते रामदास कदम यांचा ‘व्हेरी गुड... व्हेरी गुड’ हा शब्द चर्चेत आला होता. रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यानंतर राजकीय गदाराोळ उडाला होता. या घटनेला चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, शिमगोत्सवातील रंगपंचमीला पुन्हा वैभव खेडेकर यांनी उजळणी केली.वैभव खेडेकर यांनी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. रंगपंचमीनिमित्त त्यांनी लहान मुलांना रंग आणि पिचकारीचे वाटपही केले. या कार्यक्रमात त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परीधान केला होता. या कुर्त्यावर ‘व्हेरी गुड, किरीट सोमय्या आला का?’ असे लिहिलेले होते. रंगपंचमीचा उत्साह सुरु असतानाच वैभव खेडेकर यांनी घातलेल्या या कुर्त्याने रंगपंचमीत राजकीय शिमगा पाहायला मिळाला.सोमय्या उद्या दापोली दौऱ्यावरदरम्यान, किरीट सोमय्या उद्या, शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. तर, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे दापोलीतील शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे.
व्हेरी गुड... किरीट सोमय्या आला का?, मनसेचे वैभव खेडेकर यांच्या कुर्त्याची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:32 PM