टेंभ्ये : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या शाळा काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. त्यानंतर दिवाळी सुट्टीचा कालावधी संपताच ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र याचदरम्यान झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. संपामुळे गाड्याच सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.
कोरोना काळामध्ये केवळ ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. दिवाळी सुट्टीनंतर असाच अनुभव ग्रामीण भागातील शाळांना येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण बससेवा पूर्णतः बंद आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यांमध्ये मार्च २०१९ पासून शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंद करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांविना चालणाऱ्या शाळा सर्वत्र पाहायला मिळत होत्या.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑक्टोबर महिन्यापासून पासून सुरू करण्यात आले आहेत. जेमतेम एक महिन्याचे प्रत्यक्ष अध्यापन झाल्यानंतर दिवाळी सुट्टी सुरू झाली होती. सुट्टीनंतर दि.११ नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या. परंतु संप सुरू झाल्यामुळे शहर व ग्रामीण बससेवा बंद आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शहरी भागांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत होते. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.