रत्नागिरी : शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याद्वारे एका तरूणाला ब्लॅकमेल करणाºया महिलेचा भोसकून खून झाल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील भोके फाट्यानजीक तारवेवाडी येथे घडला. खुनातील संशयित आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे. शमिका शिवराम पिलणकर (३२) असे मृत महिलेचे नाव असून, संतोष बबन सावंत (३८) याला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बबन सावंत (सध्या रा. तारवेवाडी, मूळ सावर्डे, ता. चिपळूण) याची त्याच्या एका मित्राने शमिका पिलणकर (रा. फणसोप टाकळेवाडी, ता. रत्नागिरी) हिच्याशी ओळख करून दिली. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र, ज्यावेळी पहिल्यांदा संबंध निर्माण झाले, तेव्हा शमिकाने छायाचित्र टिपली होती. या छायाचित्रांवरून ती संतोष सावंत याला ब्लॅकमेल करत होती आणि त्याच्याकडून पैसे उकळत होती.
संतोष हा ट्रकचालक होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात त्याला दुखापत झाल्यामुळे तो घरीच असायचा. त्यात शमिका त्याच्याकडून पैसे उकळत होती. गुरूवारी सकाळी ११ वाजता शमिका संतोषच्या घरी गेली आणि पुन्हा पैसे मागू लागली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. शमिकाने घरातून चाकू आणला. मात्र, संतोषने तिच्याकडून चाकू काढून घेत तिच्याच पोटात दोनदा भोसकला. त्यात ती ठार झाली.
काही वेळ तसाच बसून राहिलेला संतोष नंतर एका रिक्षाने आपली पत्नी काम करते तेथे गेला. आपल्या हातून गुन्हा घडल्याचे त्याने पत्नीला सांगितले आणि तिला घेऊन तो घरी गेला. घरातील दृश्य पाहून संतोषच्या पत्नीने ग्रामीण पोलीस स्थानकाशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश कदम यांनी सहकाºयांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी संतोषला अटक करण्यात आली असून, चाकू जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकारी दाखल
खुनाची माहिती मिळताच रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. झाल्या प्रकाराची माहिती घेत त्यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत.