अरुण आडिवरेकर
रत्नागिरी - क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. अंगाने सुदृढ असणारी सर्वच मुले क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात. पण अंध मुलांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला असे सांगितले तर तुम्हाला खरे वाटेल का? पण रत्नागिरीतील क्रीडांगणावर रविवारी अंध मुलांनीही क्रिकेटचा सामना खेळून आम्हीही काही कमी नसल्याचे दाखवून दिले.
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात निमंत्रित अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील अंध मुलांनी सहभाग घेतला होता. केवळ आवाजाच्या सहाय्याने ही मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या चेंडूमध्ये छरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे तो खाली पडताच त्याचा आवाज येतो आणि मग हा चेंडू बॅटच्या सहाय्याने पटकावला जातो. या सामन्यातून अंधांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळांडूंची निवड करण्यात येणार आहे.