रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला उमेदवारी मिळणार, या एकमेव चर्चेने गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. जागा वाटप, उमेदवारी यातील काहीही निश्चित झाले नसले तरी येथे शिंदेसेना आणि उद्धवसेना या दाेघांमध्ये चुरशीची निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे.अनेक वर्षे भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात २००९ साली परिवर्तन झाले आणि तेथे राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. दोनवेळा ते राष्ट्रवादीचे म्हणून विजयी झाले आणि २०१९ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आपल्या विजयाची हॅट्ट्रीक केली. आता चौथ्यांदा ते येथे लढतील, असे दिसत आहे. पण २०१९ च्या शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष येथे सक्षम असला, तरी तो भास्कर जाधव यांच्यासोबत राहील का? असा प्रश्न आहे.
दुसरीकडे शिंदेसेनेकडून येथील उमेदवार जाहीर झालेला नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नातेवाईकाला येथे उमेदवारी दिली जाणार, अशी मोठी चर्चा झाली. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
मित्रपक्षांची भूमिका
- महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही मित्रपक्षाची साथ किती मिळेल? असा प्रश्न आहे. या जागेसाठी भाजप आग्रही होती. पण ही जागा शिंदेसेनेला जाणार असेच दिसत आहे. त्यामुळे भाजप काय करणार, हे महत्त्वाचे आहे.
- महायुतीप्रमाणेमहाविकास आघाडीतही सारे आलबेल नाही. भास्कर जाधव राष्ट्रवादीतून बाहेर पडले असल्याने तेथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना साथ देतील का? असा प्रश्न आहे. केवळ शिवसेनेच्या मतांवर सामोरे जायचे असेल तर त्यातही फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.