लोकमत न्यूज नेटवर्क
लांजा : स्वयंशिस्त व शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.
लांजा शहरापासून १३ किलोमीटरवर काजरघाटी - पावस मार्गावर वसलेले कुर्णे गाव आहे. या कुर्णे गावात तीन महसुली गावे आहेत. कुर्णे महसूल गावाची लोकसंख्या ६८४, घडशी ४१७ तर पड्यार गावची लोकसंख्या ४५८ आहे. संपूर्ण कुर्णे गावची एकूण लोकसंख्या १ हजार ५५९ एवढी आहे. गावामध्ये वरची मानेवाडी - गुरववाडी, खालची मानेवाडी - गुरववाडी, बौध्दवाडी, खाकेवाडी, कदमवाडी, ब्राह्मणवाडी, घडशीवाडी, सुतारवाडी, पड्येवाडी, दाभोलकरवाडी अशा एकूण १० वाड्या आहेत. ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत असून सार्वजनिक, धार्मिक, सामाजिक, विकासकामांच्या मुद्द्यावर सर्व ग्रामस्थ सलोख्याने कामे करतात. नुकताच कुर्णे ग्रामपंचायतीला माजी गृहमंत्री कै. आर. आर. तथा आबा पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कारही मिळाला आहे.
कुर्णे गावचे बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे - मुंबई येथे कामाला आहेत. हे चाकरमानी गणपती उत्सव, गावची यात्रा व होळी सणाला आपल्या कुटुंबीयांसमवेत हजेरी लावतात. सन २०२० मध्ये मार्च महिन्यात शिमगोत्सव असल्याने गावातील बरेचसे चाकरमानी गावात दाखल झाले होते. शिमगोत्सव संपतो न संपतो तोच देशामध्ये लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे चाकरमानी गावातच अडकून पडले. मुंबई - पुणे येथील कंपन्या बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांनी गावची वाट धरली. कोरोना कालावधीत निर्बंधांचे कडक पालन करून त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. याचे उत्तम नियोजन कुर्णे ग्रामपंचायतीने केले होते.
महानगरातून आलेल्या चाकरमान्यांची जबाबदारी प्रत्येक वाडीवर व त्यांच्या कुटुंबीयांवर सोपविण्यात आली होती. वाडीतील बंद घरांमध्ये चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेले जेवणाचे साहित्य व पाणी त्यांच्या कुटुंबीयांनी दिले आणि १४ दिवस त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे त्यांचा संपर्क येथील स्थानिक रहिवाशांशी आलाच नाही. होम क्वारटाइन केलेल्या चाकरमान्यांची व्यवस्था चांगली आहे की नाही, याची तसेच ते स्थानिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी ग्रामपंचायत घेत होती. चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्यसेविका सई भुर्के, सुप्रिया बोंबले, आशासेविका आकांक्षा कासारे, पड्यार गावच्या अंगणवाडीसेविका अक्षदा कांबळे, कुर्णे गावच्या अंगणवाडीसेविका योगिता घडशी, घडशी गावच्या अंगणवाडीसेविका अश्विनी घडशी यांनी क्वारंटाइन असलेल्या चाकरमान्यांची आरोग्याच्या दृष्टीने दरदिवशी विचारपूस केली. कुर्णेच्या सरपंच संजना पड्ये, उपसरपंच मोहन घडशी, सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील राजेश मोरे हे ग्राम कृतीदलाच्या माध्यमातून चाकरमान्यांकडून शिस्त पालन होत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवून होते. इतरत्र कोरोनोचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असताना सुनियोजनामुळेच कुर्णे गावात वेशीवरच ग्रामस्थांनी कोरोनाला रोखून धरले आहे.
सार्वजनिक कामातही नियोजन
लाॅकडाऊन काळात ग्रामस्थांना भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी ना तोटा ना फायदा या तत्त्वावर आठवड्यातून तीन दिवस ग्रामस्थांना भाजीपाला घरपोच पुरविला. कोणाला डॉक्टरकडे जायचे असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतीने तीन रिक्षा ठरवून दिल्या. त्या रिक्षाचालकांनी ग्रामस्थांना डॉक्टरकडे सोडायचे आणि त्यानेच पुन्हा घरी आणून सोडायचे ही जबाबदारी देण्यात आली होती.
...................कोरोना महामारीची कुणकुण लागताच शासनाकडून आलेल्या नियम - अटी तसेच कोरोनाविषयी घ्यावयाची काळजी याची गावामध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली. सॅनिटायझर, मास्कचे वाटप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले. ग्रामस्थ, आरोग्य यंत्रणा यांनी त्यात चांगल्या प्रकारे सहकार्य केले. चाकरमान्यांनीही कोणत्याही प्रकारची हुज्जत न घालता असलेल्या नियमांचे पालन करून गावाला कोरोना महामारीपासून दूर ठेवण्यात सहकार्य केले आहे. सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत कुर्णे गाव कोरोनाचे संकट रोखण्यात यशस्वी झाले आहे.
संजना पड्ये, सरपंच, कुर्णे