लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आवड म्हणून शेती करीत असतानाच आधुनिक तंत्रज्ञान व व्यावसायिकदृष्टीने शेतीतून उत्पन्न मिळविण्यात पिरंदवणे येथील श्रीकांत मांडवकर यशस्वी ठरले आहेत. गेले २५ वर्षे शेती करीत असतानाच बारमाही शेतीवर विशेष भर दिला आहे. कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्न मिळवित आहेत.
पावसाळी ५० गुंठे क्षेत्रावर भात लागवड केली आहे. त्यामध्ये ‘रत्ना ६’ या विद्यापीठ प्रमाणित वाणाची लागवड केली आहे. दीड गुंठ्यावर दोडका व दोन गुंठ्यावर काकडी लागवड केली आहे. प्रत्येक पिकाचे उत्पन्न व दर्जा चांगला आहे. प्रयोगशील वृत्तीमुळे नवनवीन प्रयोग शेतीत करीत आहेत. गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळत असतानाच शेतीतील प्रयोग सुरूच आहेत. त्यासाठी पत्नी श्रद्धा यांची साथ त्यांना सदैव लाभत आहे. तालुका कृषी कार्यालय व बाबू कचरे (जयसिंगपूर) यांचे मार्गदर्शन सतत लाभत आहे.
आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त
भाताची लागवड करीत असताना अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे. सध्या २० गुंठे क्षेत्रावरील भात बियाण्यासाठी कृषी संशोधन केंद्राला देणार आहेत. मात्र उर्वरित ३० गुंठ्यावरील भात स्वत:साठी वापरणार आहेत. भात काढणीनंतर सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वाल, वांगी, कुळीथ, पावटा, हिरवी मिरची, कोबी, फ्लाॅवरची लागवड करीत आहेत. चांगला दर्जा व उत्पन्न राखण्याचा प्रयत्न श्रीकांत मांडवकर यांनी केला असल्याने जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार (२०१८) देऊन सन्मानित करण्यात आले.
भरघोस काकडी उत्पन्न
पावसाळ्यात दीड गुंठ्यात दोडके व दोन गुंठ्यात काकडी लागवड केली होती. श्रावणापासून उत्पन्न सुरू झाले असून, भरघोस उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. शहरासह गावातच विक्री करणे सोपे झाली. अद्याप उत्पन्न सुरू असून, काकडी, दोडक्याचा हंगाम संपल्यानंतर पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे.
उत्कृष्ट दर्जाची कलिंगडे
दरवर्षी उन्हाळ्यात कलिंगडाचे उत्पन्न घेण्यात येत आहे. चार गुंठ्यात कलिंगडाची लागवड करण्यात येते. लागवडीपासून खतव्यवस्थापनापर्यंत विशेष काळजी घेत असल्याने ८ ते ९ किलो वजनाची कलिंगडे लगडतात. आंबा, काजू, कोकम उत्पादन घेत असून खासगी विक्रीवर अधिक भर आहे. उत्पादन ते विक्रीपर्यत विशेष मेहनत घेत आहेत.
झेंडू लागवड
झेंडू लागवड जानेवारीत केल्यामुळे शिमग्यात झेंडू तयार होवून विक्री चांगली होते. विविध प्रकारची यांत्रिक अवजारे त्यांचेकडून असून, वापरामुळे मनुष्यबळ व खर्चात बचत होते. गांडूळ खत युनिट असून दरवर्षी टनभर खत तयार करून बागायती, भाजीपाल्यासाठी वापरतात.