शिवाजी गोरेदापोली : प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळेकाझी गाव लेण्यांमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. अलिकडे लेण्यांना भेट देण्यासाठी हजारो पर्यटक या गावाला भेट देतात. परंतु गावात राजरोसपणे अवैध दारुधंदे सुरु असल्याने अनेक तरुण मुले दारुच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेकवेळा अनुचित प्रकारसुद्धा घडत असल्याने ग्रामस्थांचे समाजहित लक्षात घेऊन दारु हद्दपार करण्याचा निर्णय गावाने घेतला आहे.आगारवायंगणी, पन्हाळेकाझी कळकी गावाच्या सीमेलगत सर्रास दारु विक्री सुरु असल्याचे पंचक्रोशीच्या लक्षात आले. दारु विक्रीमुळे पंचक्रोशीतील माध्यमिक व महाविद्यालयीन युवक तसेच प्रौढ ग्रामस्थ दारुच्या व्यसनाधीन होत आहेत.
अनेक कुटुंबांमध्ये दारुच्या व्यसनाने व्यक्ती दगावून गावातील बहुतांश महिलांना ऐन तारुण्यातच वैधव्याचे जीवन जगाव लागत आहे. व्यसनाधीन व्यक्तीमुळे गावाच्या एकीत व्यत्यय येत असून, ज्या तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे, त्यांना दारुच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी गावात दारुबंदी करण्याचा निर्णय पंचक्रोशीने घेतला आहे.गावातील तरुणवर्गाला दारुपासून परावृत्त करण्यासाठी पन्हाळेकाझी ग्रामस्थांनी ग्रामसभेत गावात दारुबंदीचा ठराव केला असून, गावात बेकायदेशीर दारु विक्री व गावठी दारु सापडल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.पन्हाळेकाझी ग्रुप ग्रामपंचायतीने १७ एप्रिल २०१९ रोजीच्या ग्रामसभेत सर्वानुमते गावठी हातभट्टी व देशी विदेशी दारु पाडणे व विक्री करण्यास बंदी करण्याचा ठराव केला आहे. पन्हाळेकाझी गावात दारुबंदी व्हावी, याकरिता सरपंच दिनेश जावळे, प्रदीप जाधव - झोलाईदेवी संस्थान अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, सुमित जाधव, राजेंद्र जाधव, संदेश जाधव, सदाशिव जाधव, शशिकांत पेडणेकर, रवींद्र शेलार, सचिन जाधव, लक्ष्मण राऊत, सुरेश जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. प्राचीन लेण्यांचे गाव म्हणून जगाच्या नकाशावर झळकलेल्या पन्हाळेकाझी गावात दारुबंदी होण्यासाठी मुंबई व ग्रामीण मंडळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्राचीन लेण्यांचा वारसा लौकिक कायम ठेवणारपन्हाळेकाझी ग्रामस्थांनी समाजहित लक्षात घेऊन गावातील दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पन्हाळेकाझी गावाला प्राचीन ऐतिहासिक लेण्यांचा वारसा लाभला असून, लेण्यांमुळे जगाच्या नकाशावर झळकलेल्या गावात कायमची दारुबंदी करुन समाजाचे हित व गावाचा लौकिक अबाधित ठेवण्याचा निर्णय गावाने घेतला आहे.- प्रदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते