कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही. असाच अनुभव खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील गावकऱ्यांना येत आहे. रस्त्याची चाळण झाली असून प्रशासन त्याची दुरुस्ती करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्तादुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधीच उपलब्ध नसल्याची सबब जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. गावकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक व गर्भवती महिला यांना तातडीच्या उपचारासाठी घेऊन जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रार करून या समस्येकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
याबाबतची तक्रार आपले सरकार पोर्टलवरही नोंदवण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा ५१ लाखांचा निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून प्राप्त होणार निधी व शासन निकष यांना अधिन राहून रस्त्याचे काम योग्य त्या कार्यालयामध्ये मंजूरीसाठी प्रस्तावित करण्याचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेकडून मिळाले आहे.