क्वारंटाईन कुटुंबाची रखडलेली भात लावणी केली ग्रामस्थांनी पूर्ण
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : कोरोनाबाबत अनेक समज-गैरसमज असल्यामुळे माणूस माणसापासून दूर होत आहे. मात्र, याउलट देवरूख - पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. या वाडीतील एक कुटुंब गेल्या काही दिवसांपासून विलगीकरणात आहे. त्यामुळे त्यांचे शेतीचे काम रखडले होते, वाडीतील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्र येत रखडलेले या कुटुंबाच्या भात लावणीचे काम पूर्ण करून देत सामाजिक संदेश दिला आहे.
काेराेनामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे. पूर्वी कोणत्याही संकट काळात एका हाकेला धावणारा माणूस आज कोरोना काळात माणुसकी विसरू लागला आहे. समाजाचा कोरोनाबाधित रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांना या काळात मानसिक आधार देण्याची खरी गरज असते. माणुसकी हरवत असतानाच देवरूख - पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी कोरोना काळात अनोखा उपक्रम राबवून एकीचे व माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
या वाडीतील एक कुटुंब गेले काही दिवस विलगीकरणात आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या भात लावणीचे काम रखडले होते. या कुटुंबावर आलेले संकट ओळखून सामाजिक बांधिलकीतून वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ‘त्या’ कुटुंबाची भातलावणी पूर्ण केली. कोरोना काळात एकीकडे माणुसकी लोप पावत असतानाच देवरूख - पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. कोरोना काळात अशा कामाची खरी गरज असून, यामुळे कोरोनाबाधितांना मानसिक पाठबळ मिळणार आहे. पर्शरामवाडीतील सुमारे पंधरापेक्षा अधिक ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करून विलगीकरणात असलेल्या कुटुंबाची भातलावणी लावून दिली.