आरवली : गणेशाेत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांनी गावांच्या मंडळांशी चर्चा केल्यानंतर आजही संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली-मालपवाडी विकासकामांपासून दूर असल्याची बाब समाेर आली. गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आता सारे एकत्र आले असून, त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन समस्या मांडल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने मुंबईतील चाकरमानी आले होते. गावातील परिस्थितीबाबत त्यांनी ग्रामस्थ मंडळांसोबत चर्चा केली. या चर्चेतून गावांत अनेक विकासकामे प्रलंबित असल्याची बाब समाेर आली. त्यानंतर सगळ्यांनी पाठपुरावा करून आपल्या वाडीतील विविध कामांची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्या संदर्भातले पत्र त्यांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांना देऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. येत्या २८ सप्टेंबरला होणाऱ्या ग्रामसभेवर त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन त्या मागण्या तडीस लागतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.