चिपळूण : तालुक्यातील ओवळी सुकविलेवाडीतील गेल्या अनेक वर्षांचा कच्चा रस्ता जमीन मालकांनी अडविला आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी सुकविलेवाडीतील ग्रामस्थांनी सोमवारी चिपळूण पंचायत समितीसमोर उपोषण छेडले. याबाबत जमीन मालकास बोलावून घेत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण ताप्तुरते स्थगित केले. दरम्यान, उपोषणस्थळी एका उपोषणकर्त्याला फिट आल्याने साऱ्यांची तारांबळ उडाली.तालुक्यातील ओवळी सुकविलेवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळीच भर उन्हाच्या कडाक्यात पंचायत समिती समोर उपोषणाला सुरुवात केली. वाडीतील दोघांनी रस्त्याची अडवणूक केली आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वाडीसाठी टंचाईमधून सुमारे ३ लाख रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर झाली आहे. या रस्त्याच्या कडेला लागून पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकली जाणार आहे. मात्र, येथील दोघे जमीनमालक रस्त्यासाठी हरकत घेत असल्याने जलवाहिनीचे काम रखडले आहे. पंचायत समिती प्रशासनाने रस्त्याचा तोडगा काढावा, या मागणीसाठी पंचायत समितीसमोर उपोषण छेडले.या रस्त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या २३ नंबर असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षांपासून हा वाद सुरू आहे. त्यावर ठोस निर्णय होण्यासाठी ग्रामस्थांनी भर उन्हाच्या तडाख्यात उपोषण छेडले. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी उपसभापती प्रताप शिंदे, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सभापती पूजा निकम, सदस्य सुनील तटकरे, पांडुरंग माळी, गटविकास प्रशांत राऊत यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यानुसार आठवड्यात संबंधित जमीनदारांसमवेत संयुक्त बैठक घेऊन तोडगा घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण स्थगित केले. यावेळी उपसरपंच दिनेश शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सुकविलेवाडीतील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
..अन् साऱ्यांची उडाली तारांबळ, रस्ता अडवल्याने सुकविलेवाडीतील ग्रामस्थांचे भर उन्हात उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:15 PM