विनोद पवारराजापूर : गावाच्या चारही बाजूंनी निळेशार पाणी, गावात १११ घरे आणि लोकसंख्या मात्र फक्त ७८. गावात राहायला कोणी तयारच नाहीत. कारण गावात ये-जा करायला रस्ताच नाही. कोणी आजारी पडले तर रुग्णवाहिका गावापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे कुणी रस्ता देईल का रस्ता, असे म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.गेली अनेक वर्षे जुवे गावाची ही समस्या कायम आहे. त्याबाबत सर्व यंत्रणांचे दरवाजे वाजवूनही दखल घेतली गेलेली नाही. २००९ साली या बेटापासून देवाचे गोठणे गावापर्यंत खारभूमी खात्याने बंधारा बांधला. त्यावरून ये-जा सुरू झाली. मात्र, हे सुख ग्रामस्थांच्या नशिबात अल्पकाळच टिकले. देवाचे गोठणे येथे बंधाऱ्याला जोडणारा मार्ग खासगी जागेतून जात असल्याने तो बंद करण्यात आला आहे.२००९ साली बंधारासाधारण १९६९ साली या गावाला शासनाने ग्रामपंचायत मंजूर केली. दरवर्षी निवडणूक बिनविरोध करून या गावाने शासनाचे लाखो रुपये वाचवले आहेत. मात्र, शासन अद्यापही या गावाला सापत्न वागणूक देत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. २००९ साली खारभूमी विकास मंडळ, उपविभाग लांजा यांच्यामार्फत जुवे (जैतापूर) बेट ते देवाचे गोठणे (राघव वाडी) असा ९०० मीटर लांबीचा बंधारा पूर्ण झाला.रस्त्याचे सुख अल्पकाळसर्व प्रकारची वाहतूक (दळणवळण) होण्यासाठी या बंधाऱ्याच्या जुवे बेटावरील ग्रामस्थांना उपयोग होऊ लागला. मात्र, देवाचे गोठणे (राघव वाडी) हद्दीतील जुवे बंधाऱ्यापर्यंत येणारा रस्ता वैयक्तिक मालकी हक्काच्या जागेतून येत असल्याने तो २०११ सालापासून बंद करण्यात आला, असे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर मधला काही काळ रस्ता चालू होता. मात्र, गेली काही वर्षे तो पुन्हा बंद झाला आहे.निम्मी घरे बंदच...राजापूर तालुक्यातील जैतापूरच्या खाडीत वसलेले हे जुवे जैतापूर बेट. स्वतंत्र ग्रामपंचायत असणारे. गावाची लोकसंख्या फक्त ७८! जवळपास ४५ हेक्टर क्षेत्रावर वसलेल्या या बेटावर घरे मात्र १११. त्यातील निम्म्याहून अधिक घरे बंदच आहेत. कारण गावात यायला रस्ता नाही!राजापूरच्या गढीचे संरक्षणया गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर येथे कैद केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या महाराणी ताराराणींना याच जुवे बेटावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली असणारे हे जुवे बेट एकेकाळी राजापूर खाडीत येणाऱ्या परकीयांच्या आक्रमणांवर नजर ठेवून असायचे. राजापूरच्या गढीचे संरक्षण करायचे! पण आता या बेटाचे संरक्षण कोणी करायचे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. होडीच ठरते तारणहार
- सध्या या गावाचे सर्व व्यवहार व प्रवास हा फक्त होडी वाहतुकीवरच अवलंबून आहे. बाराही महिने अगदी रेशनपासून ते डॉक्टरपर्यंत सर्व सेवांसाठी फक्त होडीतूनच प्रवास करावा लागत आहे.
- गावात चौथीपर्यंतची शाळा असली तरी पुढील शिक्षणासाठी होडीने जैतापूर गाठावे लागत आहे. अनेक वर्षे येथील ग्रामस्थ तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे देवाचे गोठणे गावातून जुवे बंधाऱ्यापर्यंत येणाऱ्या रस्त्याची मागणी करत आहेत. मात्र, अजूनही त्याला मूर्त स्वरूप नाही.
गेली अनेक वर्षे आम्ही शासनाकडे देवाचे गोठणे येथून जुवे खारलँड बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्याची मागणी करत आहोत. या रस्त्यासाठी वेळोवेळी शासन पातळीवर निवेदने दिलेली आहेत. मात्र, शासन या मागणीकडे कानाडोळा करत आहे. परिणामी आम्हाला अनेक वर्षे नरकयातनाच भोगाव्या लागत आहेत. शासनाने आता तरी आमच्या या रस्त्याच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करावा. नाही तर काही वर्षातच जुवे गाव निर्मनुष्य होऊन जगाच्या नकाशावरून नष्ट होईल. - अनिल करंजे, जुवे ग्रामस्थ