लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अभिनेेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने जिल्ह्यातील पाणी चळवळीला गती दिली आहे. अनेक गावांनी या फाऊंडेशनच्या सहाय्याने आपल्या गावामधील नदी-नाले, ओहोळ यामधील गाळ उपसा करून त्यांचा श्वास मोकळा केला आहे. रांगव (ता. संगमेश्वर) ग्रामस्थांनीही गावातील नदीतील गाळ उपसा करून अनेक वर्षे शेतीला पुरापासून होणारा धोका दूर केला आहे.
रांगव गाव तसे दुर्गमच. सात वाड्या असलेल्या या गावाची लोकसंख्या १,२००च्या घरात आहे. बहुतांशी ग्रामस्थांचे मुख्य उत्पन्न शेतीवर आधारलेले. या गावातील धरणाचे काम काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. साधारणत: १९९४ - ९६ या कालावधीत धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र, या धरणातील गाळ पूर्णपणे रांगव नदीत आला. त्यामुळे या नदीचे पात्र गाळाने पूर्णपणे भरले. त्यातच त्यावर अनावश्यक वनस्पतीही मोठ्या प्रमाणावर उगवल्याने झाडीही मोठ्या प्रमाणावर वाढली होती. नदीची ऑक्सिजन पातळीही खालावली होती.
त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात या नदीतील गाळामुळे पूर यायचा. या गावातील बहुतांश शेती नदीकिनारी दोन्ही बाजूला असल्याने पुराचे पाणी या शेतांमध्ये घुसून दरवर्षीच नुकसानाचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागत होता. यावर काहीतरी मार्ग काढायला हवा, या विचाराने ग्रामस्थांना अस्वस्थ केले.
यातूनच पर्याय मिळाला तो म्हणजे, रांगव गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या नदीतील गाळ उपसा करणे, तिची खोली वाढवणे आणि नदीचे पुनर्जीवन करणे. यात महत्त्वाचे योगदान ठरले ते रांगव गावच्या मुंबईस्थित युवा संघटनेचे. या संघटनेचे. ‘एकच ध्यास, गावचा विकास’ हे ब्रीद असलेल्या मौजे रांगव युवा संघटना (ग्रामस्थसह मुंबई) ही संघटना लगेचच कामाला लागली. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नाम’च्या कार्याबद्दल बरेच ऐकले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून ही संघटना ‘नाम’च्या संपर्कात होती. अखेर ‘नाम’चे कोकण विभागाचे समन्वयक समीर जानवलकर यांच्या माध्यमातून नामने सहकार्याचा हात देऊ केला. जलतज्ज्ञ अविनाश निवते, अमित गोखले यांनी पाहणी करून आराखडा तयार केला. सुमारे २ लाखांचा निधी उभा करणे गरजेचे होते. परंतु, हे आव्हान श्रीकांत सरमोकादम, आशिष सरमोकादम यांच्यासह ग्रामस्थ चंद्रकांत मिरगल, वीरेश कुंभार, महेश साळवी, तुकाराम कदम, लहू कानल, संतोष धामणस्कर, प्रभू रांगणेकर, सूर्यकांत खताते याचबरोबर मौजे रांगव युवा संघटना (ग्रामस्थसह मुंबई)चे सुधीर मिरगल, थोरवशे, सचिन कुंभार, विजय जाधव, विशाल सनगर, प्रशांत रांगणेकर, सत्यवान कुंभार यांनी निधी उभारण्याचे शिवधनुष्य खांद्यावर घेतले आणि ते यशस्वीही केले.
नाम फाऊंडेशनकडून उपलब्ध झालेल्या मशिनरीच्या सहाय्याने एप्रिल २०२१मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. साधारणत: ४० दिवसांमध्ये गाळ उपशाचे काम पूर्ण झाले. या कालावधीत अडीच किलाेमीटर अंतरातील गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे तब्बल ७० लाख लीटर पाणीसाठा तयार झाला. यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत अनेक गावांमधील शेतीत पाणी शिरले. मात्र गाळमुक्त झालेल्या नदीमुळे रांगवमधील कुठल्याच शेतात पाणी आले नाही. त्यामुळे एवढ्या वर्षानंतर मिळालेल्या या समाधानामुळे ग्रामस्थांनी नाम फाऊंडेशनला धन्यवाद दिले.