रत्नागिरी : ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमधील अनभिज्ञता, लसीकरण केंद्रावरील लांबच लांब रांगा आणि लसींचा तुडवडा यातून हजारो नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळाला नसल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमधील अनभिज्ञता, लसीकरण केंद्रावरील लांबच लांब रांगा आणि लसींचा तुडवडा यामुळे अनेक गावांमधील जनता लसीपासून वंचित राहात आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचतर्फे बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, श्रीनिवास दळवी, नीलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, आनंद विलणकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
लसीकरणासोबतच ग्रामीण भागातील अनेक गावांतील लोक सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेत नाहीत, तसेच वैद्यकीय उपचार घेण्यात दिरंगाई करीत असल्याने गावातील गाव कृती दलामार्फत याबाबत जागृती करण्यात यावी आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी करावेत, असेही यात नमूद केले आहे.
काही गावात क्रिकेटसारखे खेळ सुरू असल्याने लॉकडाऊनच्या प्रयत्नांना खीळ बसत असून, याकामी ग्रामीण स्तरावरील बीट अंमलदार यांना कारवाई करण्याचे अधिकार द्यावेत, असेही समविचारीने या निवेदनात म्हटले आहे.